अजित पवार-चंद्रकांत पाटील यांच्यात पुण्यात बैठक, जिल्ह्यातील पाण्याचं नियोजन करण्यासाठी चर्चा

पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कालवा समितीची बैठक घेण्यात आली. पुण्याचे खासदार गिरीष बापट, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील या बैठकीत उपस्थिती होते. बैठकीत पुणे जिल्ह्यातील धरण आणि कालव्यातून होणाऱ्या पाण्याचं नियोजन करण्यासाठी चर्चा करण्यात आली. खडकवासला धरण साखळी पवना धरण, भामा आसखेड, चासकमान आणि उजनी अशा वेगवेगळ्या धरणाच्या पाण्याच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. भामा आसखेड योजनेसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे रखडलेला निधी लवकरात लवकरदेण्यात यावा अशा सूचना अजित पवार यांनी दोन्ही महापालिकेला दिल्या. त्याचबरोबर खडकवासला धरण ते फुरसुंगीपर्यंत बंद बोगद्यातून पाणी वाहन नेण्याच्या विषयावर चर्चा झाली असल्याच अजित पवार यांनी सांगितलं. मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी पुण्यातील सर्व धरणात चांगला पाणीसाठा आहे. तरीदेखील पुण्यातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा अशा सूचना अजित पवार यांनी या बैठकीत दिल्या.